माय मराठी भाषा शुद्धीकरणाचा संकल्प करुया - गायकर यांचे आवाहन
ईगतपुरी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
आहुर्ली-वार्ताहर - नुसती परिपत्रक वा दिनदर्शिकेवरच कोरड्या शब्दालंकारानं मराठी राजभाषा असल्याचा टाहो किंवा उच्चार नको तर त्या दिशेने प्रयत्नासाठी संकल्प करु या.शुद्ध मराठी भाषेचा दैनंदिन वापरात सतत वापर करु या. या भाषेत इतर शब्दाचीं घुसखोरी रोखु या. आज पासुन मराठी भाषा शुद्धीकरण मोहिमेचा संकल्प करु या असे कळकळीचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक चे जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यीक नवनाथ अर्जुन पा गायकर यांनी केले.
कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ईगतपुरी यांचे वतीने आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड हे होते. यावेळी व्यासपीठावर शाहिर बाळासाहेब भगत, कवयित्री शुभांगी पाटिल, उप प्राचार्य देविदास गिरी उपस्थित होते.
यावेळी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात पुढे बोलताना गायकर यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगताना ती अत्यंत महान व पुरातन भाषा असल्याचे नमुद करत तिचं वैभव माय मराठी च्या लेकरानींच टिकवायला हवं असं प्रतिपादन केले.
सर्व प्रथम उपस्थित मान्यवर यांचे हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करणेत आले.
कार्यक्रमात शाहिर बाळासाहेब भगत यांनी आपल्या पहाडी आवाजात शाहिरी कवने व पोवाडे सादर करताना मराठी भाषेची महती सांगितली. तर कवयित्री शुभांगी पाटिल यांनी आपल्या गोड गळयाने कविता सादर करत उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य भाबड यांनी मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देवु असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी महाविद्यालयातील सायली वालझाडे, संध्या गव्हाणे, समाधान भोर, सारिका पाळदे, किरण मते आदी विद्यार्थ्यांनी आप आपल्या कविता सादर केल्या.
फोटो कॅप्शन - मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जेष्ठ साहित्यीक नवनाथ गायकर
व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ पी आर भाबड, शाहिर बाळासाहेब भगत, कवयित्री शुभांगी पाटिल आदी (छाया - नवनाथ गायकर आहुर्ली)