पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ यांना अनावृत पत्र...
दिनांक - २५/०४/२०२०
प्रति
मा श्री छगन भुजबळ साहेब,
अन्न व नागरी पुरवठा मंत्री
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,
मुंबई.
सस्नेह नमस्कार.
नुकतेच आपण रेशनकार्ड असलेल्यांना आता दाळही मिळेल असे जाहीर केले आहात. या पत्राद्वारे भुजबळ साहेब आपणास वस्तुस्थीती कळवत आहे. याकडे आपण लक्ष देवुन कार्यवाही केल्यास महाराष्ट्रातल्या लाखो परिवारास दिलासा मिळेल. जीवघेण्या कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून बाविस मार्चपासून केंद्र सरकार आणि राज्य शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केल्याने सर्व सामान्यांना जगण्या साठी मदत झाली पाहीजे म्हणून स्वस्त धान्य दुकानातून पिवळे रेशनकार्ड, केशरी रेशनकार्ड असलेल्या, दारिद्रय रेषेखालील व अन्न सुरक्षा योजने मधील लाभार्थींना गहू आणि तांंदुळाचा पुरवठा करण्यात येतो आहे.
त्यांंना आता दाळीचा हि पुरवठा केला जाईल,असे आपण जाहीर केले आहात.
पण ज्यां विधवा, परित्यक्ता, तसेच मजूर, पोटासाठी गाव सोडून बाहेर गावी आलेल्या अनेकाना, अद्याप रेशनकार्डच नसलेल्याना, तसेच अनेकांचे रेशनकार्ड ऑनलाईनच झालेले नाही आणि जो या योजनेसाठी पात्र असूनही प्रशासन व स्वस्त धान्य दुकानादारांच्या भोंगळ कारभारा मुळे अन्न सुरक्षा योजना यादीत ज्यांंचे नाव अनेकवेळा कागदपत्रे देवूनही आलेलेच नाही, त्यांंच्या अडचणीवर आपण मार्ग कधी काढणार आहात ? आणी त्यांना रेशन कधी देणार आहात ?
देशात कोरेाना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून मार्च मध्ये शासनाने संचारबंदी केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या राज्यातील लाखो कामगार, मजूर, परित्यक्ता, विधवा, रेड भागा मधील गरजू, दारिद्रय रेषे खालील लाभार्थी , अंत्योदय योजनेसाठी पात्र शेतकर्यांंचीही उपासमार होवू नये म्हणून स्वस्त धान्य दुकानांमधून प्रति माणसी पाच किलो गहू तांंदुळाचे वितरण करण्यात येत आहे. तर केंद्र शासनाकडून प्रति माणसी पाच किलो मोफत तांदुळाचे एप्रिलपासून वितरण करण्यात येते आहे.
संचारबंदीच्या पहिल्याच आठवड्यात केंद्र आणि राज्य शासनाने कोणीही हातावर पोट असलेला केशरी रेशनकार्ड असो की पिवळे रेशनकार्ड धारक असो अथवा रेशनकार्ड नसलेला परिवार असो , त्याला जवळच्या स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, तांंदुळ, दाळ आदींचे वाटप केले जाईल, असे जाहीर केले होते. दोन्ही सरकारांनी असा दिलासा दिल्यामुळे असंख्य कामगारानी, ज्यांंच्याकडे रेशनकार्ड नाही किंवा ज्यांचे ऑनलाईन झालेले नाही अशांनी आज ना उद्या आपल्या पदरात स्वस्त धान्य मिळेल या आशेवर , उधार उसनवारी करुन, अन्य कोणाच्या मदतीवर हे दिवस काढले आहेत.
एकीकडे मोलमजुरीचे काम बंद आणि दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदाराकडे जावून चकरा वर चकरा मारुन, धान्य देण्याची विनंती केली पण त्यांच्या पदरी निराशे शिवाय काहीच पडले नाही. दुकानदार तर सांगतो आहे कि तुम्हाला धान्य देण्याबाबत वरुन तशा काहीही सूचना किंवा तशा प्रकारचे धान्य देण्यास सांगितलेले नाही. आज या गोष्टीला तीन आठवडे होवुन गेली, मात्र शासनाकडुन स्वस्त धान्य दुकानदारांना रेशनकार्ड नसलेल्यांना कमी किमतीत गहू, तांदुळ देण्याचा आदेश काही आलेला नाही. आता लॉकडाऊन शिथील केल्याचे सांगितले जात आहे, होईल सुध्दा, पण ज्या विधवा, परित्यक्ता, मजुर, कामगारांना केशरी, पिवळे रेशनकार्ड आहे पण त्यांंचे रेशनकार्ड ऑनलाईन केले गेले नाही.जे गरजू, पात्र आहेत मात्र त्यांचे नाव अन्न सुरक्षा यादीत नाही, प्रशासन तर थारा ही लागू देत नाही. बाहेर पोलीस उभे आहेत, संचारंबदी सुरु आहे, मग या लोकांनी करायचे तरी काय ? तसेच सरसकट कमी किमतीतले धान्य देण्याच्या घोषणेचे काय झाले ?
हे सगळे असे चालू असताना आपण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणुन शनिवारीच स्वस्त धान्य दुकानातून आता तूर अथवा हरभरा दाळीचे वितरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
ही समाधानाची बाब असली तरी वरील अडचणीचे करायचे तरी काय ? आॕनलाईन, अन्न सुरक्षा यादीत नाव घालण्यासाठी अनेकदा दुकानादारांना आधारकार्ड दिले. तरीही गेली दोन तिन वर्षापूसन अजून तुमचे नावच त्या यादीत आले नाही, असे दुकानदार सांगत आहेत. तहसीलच्या पुरवठा विभागाचे ऑनलाईनचे काम जानेवारीपासून बंदच आहे . काही अन्न सुरक्षा योजनेत न बसणारे लोक प्रशासनाच्या आवाहना नंंतर ही अन्न सुरक्षेचा हक्क सोडायला तयार नाहीत, तर दुसरीकडे असंख्य गरजू परिवार या अन्न सुरक्षा योजने पासून का दूर आहेत ? याची सखोल चौकशी करणे आवश्यक असून वरील घटकांना तातडीने शिधापत्रिका व रेशन मिळाले पाहीजे अशी आपणास विनंती करीत आहे.
आपला
व्यंकट पनाळे, पत्रकार, लातुर.
९४२२०७२९४८