तळा तालुक्यात शेनाटे गावात तीन कोरोना पाॅझिटीव्ह
शेनाटे गावातील अर्धा परिसर सील, कंटेनमेंट झोनमध्ये नोंद
महाराष्ट्र 24 आवाज
तळा- श्रीकांत नांदगावकर
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने राज्यातील ग्रामीण भागात आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.
तळा तालुक्यातील शेनाटे गावात तीन कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण सापडले असून तालुक्यातील रूग्णांची संख्या पाच झाली आहे.
मुंबई येथील बोरिवली येथून गावाकडे परतलेल्या एका दांपत्याला नवरा(वय५०)पत्नी(वय ४४) आणि त्यांचा मुलगा वय(२९) कोरोनाची लागण झाल्याची माहीती आहे. दरम्यान शनिवारी चरई(बुद्रुक) येथील एका युवकाचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला असताना त्याच दिवशी संध्याकाळी तीन रुग्णांची भर पडल्याने सध्या तळेवासियांनी सावध पवित्रा घेतला आहे.या चारही रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तळा तालुक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा आता पाच वर पोहचला असून चिंता वाढली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यानंतर शेनाटे येथील दांपत्य आणि त्यांचा मुलगा यांचे स्वॅब टेस्ट तपासणीसाठी शुक्रवारी (दि.२२) रोजी पाठविण्यात आले होते रविवारी (दि.२४) सायंकाळी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या तीनही रुग्णांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातून आज मुंबई येथे हलविण्यात येणार आहे.
शेनाटे येथील दांपत्य (दि.१४) रोजी बोरिवली ते खारपाडा ईनोवा गाडीने आले त्यानंतर एक कि.मी. चालत प्रवास केला त्यानंतर खारपाडा ते इंदापुर ईको गाडीने प्रवास केला आहे त्यानंतर इंदापुर ते तळाटेम्पो ने प्रवास केला आहे. या दांपत्याचा मुलगा (दि.१३) मोटर सायकलने प्रवास करत तळा येथे आल्याचे समजते आहे. प्रशासनाने या तिघांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरित सुरक्षा म्हणुन होम काॅरंटाईन केले असून घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले आहे. तसेच पाॅझिटीव्ह रूग्णाच्या परिसरातील अर्धा गाव सील करण्यात आला असून कंटेनमेंट झोनमध्ये नोंद करण्यात आली आहे. मुंबईतून व उपनगरातून हाॅटस्पाॅट असणाऱ्या ठिकाणाहून तळा तालुक्यात २३ मे पर्यंत २१००० चाकरमानी गावाकडे आले आहेत. तळा तहसिल प्रशासन, पोलिस प्रशासन व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असे प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यातआले आहे.