मराठा सेवा संघाच्या चळवळीतला सच्च्या सोबती हरवला-प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार
महाराष्ट्र 24 आवाज
लातूर, ( गोविंदराव निकम )
मराठा सेवा संघाची सामाजिक व वैचारिक चळवळ अनेक निर्भिड, कर्तृत्ववान, धैर्यवान व्यक्तींच्या समर्पणावर चालत आलेली आहे. अशा समर्पित व्यक्तींमध्ये शांताराम बापू कुंजीर हे एक होते. असे मराठा सेवा संघांचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांनी स्वर्गीय बापू कुंजीर यांना शिवांजली पर बोलताना व्यक्त केले.
शांताराम बापूंनी मराठा सेवा संघाची वैचारिक लढाई आणि विविध पुरोगामी चळवळी अशा अनेक पातळीवर समर्थपणे लढली. शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार तळागाळातल्या बहुजनांपर्यंत पोहोचावा, यासाठी शांताराम बापूंनी अनेक मेळावे, सोहळे, संमेलने आयोजित केली. चळवळ अधिक सक्षम व्हावी, संघटनेच जाळं महाराष्ट्रभर पसराव व समाजाची उन्नती व्हावी यासाठी शांतारामबापूंनी प्रचंड प्रवास केला.
जगण्याची लढाई स्वबळावर असली पाहिजे या विचाराचे बापू होते. बापू खूप हळव्या आणि संवेदनशील मनाचे माणूस होते. कोणत्याही गरजू मराठा तरुणाच्या मदतीला अर्ध्या रात्री धावून जाणारा माणूस मी त्यांच्यात पाहिला.
मराठा समाजाच्या उत्थानासाठी या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हे शांताराम बापूचे देखील ध्येय होतं. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. निवेदने दिली, मोर्चे काढले. वेळप्रसंगी कारावास देखील भोगला. इसवी सन २०१३ - २०१४ साली मराठा आरक्षणासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवशाहू रथयात्रा मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर काढली होती. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे, शांताराम बापू कुंजीर व इतर पदाधिकारी यांच्यासह मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो. समाजातील कोणतीही जबाबदारी कोणत्याही तक्रारी शिवाय समर्थपणे पेलणारे शांताराम बापू होते.
बापू गेल्याची बातमी ऐकून मनाला खूप दुःख झाले. अत्यंत जवळचा एक सहकारी आम्ही गमावला आहे. बापूची उणीव कायम राहील.
शांताराम बापूंना भावपूर्ण शिवांजली..!
सर्व कुटुंबीय व नातेवाईकांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना.
शिवश्री कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ