सोयाबीनची पेरणी करत असताना सुशीलाबाई गादगे या शेतकरी महिलेचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.
शेतकरी परिवाराला ५० लाख रुपये विम्याचे कवच देण्याची आवश्यकता.
महाराष्ट्र 24 आवाज
प्रतिनिधी- व्यंकटराव पनाळे
लातुर :- चाकूर तालुक्यातील चापोली या गावात एका शेतकरी कुटुंबातील शेतकरी महिलेचा सोयाबीनची पेरणी करत असताना हृदयविकाराचा झटका येऊन जागीच मृत्यू झाला.
अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना चापोली गावातील शांताप्पा रामलिंग गादगे यांच्या कुटुंबात घडली. शांताप्पा रामलिंग गादगे आणि त्यांच्या पत्नी सौ सुशीलाबाई शांताप्पा गादगे वय ५५ वर्षे हे शेतकरी कुटुंब. स्वतः शेतामध्ये राब राब राबून मेहनत करून शेती पिकवणारा हा परिवार आहे. चापोली पासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर गादगे यांची ४ हेक्टर शेती आहे. चापोली ते अजन्सोंडा या रस्त्यावर या रस्त्यापासून आत एक किलोमीटर अंतरावर त्यांची शेती आहे.
दिनांक १६ जून वार मंगळवार रोजी सोयाबीनची पेरणी करण्यासाठी गादगे पती-पत्नी आणि मजूर शेतावर गेले. जमिनीचा वाफसा झालेला होता. तिफणिला बैलजोडी जुंपली आणि तिफण सुरू झाली. स्वतः सुशिलाबाई शांताप्पा गादगे यांनी कमरेला सोयाबीनच्या बियाण्याची ओटी बांधून तिफणी मागे नळ्याच्या चाड्या वर मुठ धरली. आणि पेरणी सुरू केली.
बहिणाबाई चौधरी यांच्या "काळया मातीत मातीत तिफण चालते" या कवितेतील "संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला" या काव्यपंक्ती प्रमाणेच सुशीलाबाईनी आपल्या पोटाला सोयाबीनच्या बियाण्याची ओठी बांधली होती. प्रवासाचा पडलेला तान आणि तिफणी च्या मागे चालून-चालून सुशिलाबाई दमून गेल्या होत्या. शेतकरी पेरणीची वेळ कधी चुकवत नाही. आणि शेतकऱ्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. पेरणी करताकरताच अचानक त्यांच्या छातीत जोराची कळ आली आणि ओठीतले बियाणे ओठीत मुठीतले बीयाणे मुठीत राहिले. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सुशिलाबाई चालत असतानाच कोसळल्या. तिफण जागेवर थांबली. कोसळलेल्या सुशिलाबाईची मान शांताप्पाणे आपल्या मांडीवर घेतली. पाण्याचा घोटही न घेता सुशिलाबाईची प्राणज्योत मालवली. तिफणी पासून आखाड्या पर्यंत सुशिलाबाईला हातावर उचलून घेऊन आणले गेले. आखाडा ते मुख्य रस्त्यावर एक किलोमीटरपर्यंत शेतात वाहन यायला रस्ता नाही. आखाड्यावर असलेल्या झोपण्यासाठीच्या बाजेवर त्या मयत झालेल्या शेतकरी माऊलीस एक किलोमीटर पर्यंत आणण्यात आले. आणि मग तेथून वाहनात ठेवून घरी आणण्यात आले. दिनांक १७ जून वार बुधवार रोजी त्या शेतकरी महिला कैलासवासी सौभाग्यवती सुशिलाबाई शांताप्पा गादगे यांच्यावर चापोली येथील लिंगायत स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती शांताप्पा गादगे, मुले रामेश्वर, परमेश्वर सुना पल्लवी, सोनाली चार नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे चापोली परिसरात शोककळा पसरली होती.
एखादा कर्मचारी कामावर असताना जर त्याचा मृत्यू झाला तर शासन त्याबाबतची नुकसानभरपाई देत असते. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी त्याच कुटुंबातली प्रत्यक्ष शेतात कष्ट करणारी शेतकरी माऊली सोयाबीनची पेरणी करत असताना मृत्यू पावली शासन या कुटुंबाला काही नुकसान भरपाई देणार का हा खरा प्रश्न आहे. शेतकऱ्यांची बँक असलेली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या शेतकरी महिलेच्या मृत्यूची दखल घेऊन बँकेने या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे. विधानसभा सभागृहात आणि विधान परिषदेच्या सभागृहात लोकप्रतिनिधींनी शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातील कोणीही शेतावर काम करत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा ठराव मंजूर करून घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, महसूल कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, अथवा कोरूना योद्धा यांना ज्या प्रमाणे ५० लाख रुपये विम्याचे कवच शासनाने जाहीर केले त्याप्रमाणेच शेतकरी कुटुंबासाठी सुद्धा ५० लाख रुपयाचे विम्याचे कवच देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहन जाईल अशा शेतीसाठी वाटा, रस्ते शासनाने करून देण्याची आवश्यकता आहे.
-- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८