“निसर्ग” चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना विशेष बाब म्हणून वाढीव दराने मदत
असे आहेत नवीन वाढीव दर
राज्य शासनाचा ऐतिहासिक , लोकाभिमुख निर्णय
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी - योगेश भामरे
दि. 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बसला आहे. या पूरपरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी विविध शासन निर्णयांद्वारे शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी एक विशेष बाब म्हणून वाढीव दराने मदत देण्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत.
दि.17 जून 2020 रोजी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल्या मदतीच्या दरामध्ये केवळ याच घटनेसाठी एक विशेष बाब म्हणून वाढ करणे व मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अन्वये विहित केलेल्या निकष अटींमध्ये बदल करून राज्य शासनाच्या निधीतून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत दि. 10 जून 2020 च्या शासन निर्णयान्वये नवीन बाबीसाठी तसेच वाढीव दराने मदत मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
बाब
नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्ण क्षतीग्रस्त झाली असल्यास, कपडे तसेच घरगुती भांडी / वस्तूंकरिता अर्थसहाय्य.
प्रचलित दर
प्रति कुटूंब रुपये 2 हजार 500 कपड्यांच्या नुकसानीसाठी, प्रति कुटूंब रुपये 2 हजार 500 घरगुती भांडी / वस्तू नुकसानीसाठी.
मदतीचे वाढीव दर
प्रति कुटूंब रुपये 5 हजार कपड्यांच्या नुकसानीसाठी, प्रति कुटूंब रु.5 हजार घरगुती भांडी / वस्तू नुकसानीसाठी.
या शासन निर्णयानुसार नव्याने मंजूर
अंशत: पडझड झालेल्या (किमान 15 टक्के ) कच्च्या/पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत क्षतीग्रस्त झाल्याने अथवा पत्रे / कौले / छत उडून गेल्याने घरातील कपडे व घरगुती भांड्यांचे / वस्तूंचे नुकसान झाले आहे, अशा प्रकरणी देखील मदतीच्या वाढीव दराने मदत अनुज्ञेय राहील.
अंशतः पडझड झालेल्या कच्च्या/पक्क्या घरांसाठी मदत
अंशत: पडझड झालेल्या (किमान 15 टक्के) पक्क्या / कच्च्या घरांसाठी मदत- प्रचलित दर रुपये 6 हजार प्रति घर, मदतीचे वाढीव दर रुपये 15 हजार प्रति घर.
अंशतः पडझड परंतु किमान 25 टक्के नुकसान झालेल्या पक्क्या / कच्च्या घरांसाठी मदत- प्रचलित दर रुपये 6 हजार प्रति घर, मदतीचे वाढीव दर रुपये 15 हजार प्रति घर, या शासन निर्णयाद्वारे नव्याने मंजूर रुपये 25 हजार प्रति घर.
अंशतः पडझड परंतु किमान 50 टक्के नुकसान झालेल्या पक्क्या / कच्च्या घरांसाठी मदत- प्रचलित दर रुपये 6 हजार प्रति घर, मदतीचे वाढीव दर रुपये 15 हजार प्रति घर, या शासन निर्णयान्वये नव्याने मंजूर रुपये 50 हजार प्रति घर.
पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या / कच्च्या घरांसाठी मदत- प्रचलित दर रुपये 95 हजार 100 प्रति घर, सखल भागातील आणि रुपये 1 लाख 1 हजार 900 दुर्गम भागातील, मदतीचे वाढीव दर रुपये 1 लाख 50 हजार प्रति घर
मत्स्य व्यावसायिकांचे नुकसान
• बोटींची अंशतः दुरुस्ती- प्रचलित दर रुपये 4हजार 100, या शासन निर्णयान्वये नव्याने मंजूर रुपये 10 हजार.
• पूर्णतः नष्ट झालेल्या बोटींसाठी- प्रचलित दर रुपये 9 हजार 600, या शासन निर्णयान्वये नव्याने मंजूर रुपये 25 हजार.
• अंशतः बाधीत झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी- प्रचलित दर रुपये 2 हजार 100, या शासन निर्णयान्वये नव्याने मंजूर रुपये 5 हजार.
• पूर्णतः नष्ट झालेल्या जाळयांसाठी- प्रचलित दर रुपये 2 हजार 600, या शासन निर्णयान्वये नव्याने मंजूर रुपये 5 हजार.
मात्र शासनाच्या या शासन निर्णयात एक अट अशी आहे की, आपत्तीप्रसंगी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली अनुदान अथवा मदत घेतली असल्यास ही मदत अनुज्ञेय असणार नाही.
अंशतः पडझड झालेल्या (किमान पंधरा टक्के) नुकसान पक्क्या / कच्च्या घरांपैकी ज्या घरांचे क्षतीग्रस्त झाल्याने अथवा पत्रे/कौले/छत उडून गेल्याने घरातील कपडे व घरगुती भांड्यांचे / वस्तूंचे नुकसान झाले आहे,अशा कुटुंबांना कपड्यांच्या व घरगुती भांडी / वस्तूंच्या नुकसानीसाठी देय होणाऱ्या मदतीसाठीचा पूर्ण खर्च राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात यावा. तसेच मदतीची रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून व वाढीव दरानुसार येणाऱ्या फरकाची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधून देय राहील.
मत्सव्यावसायिकांचे नुकसान या बाबीसाठीची मदतीची रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून व वाढीव दरानुसार येणाऱ्या फरकाची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधून देय राहील.
हा शासन निर्णय एक विशेष बाब म्हणून निर्गमित करण्यात आला असून तो केवळ “निसर्ग” चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नुकसानी करिताच लागू राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग
000000