निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त कुटुंब अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत
माणगाव तालुक्यातील अनेक कुटुंब मदतीपासून वंचित
नुकसानग्रस्तांच्या खात्यावर तात्काळ मदत जमा करण्याची प्रशासनाकडे मागणी
शेतक-यांची वनविभागाकडे विशेष मागणी
महाराष्ट्र 24 आवाज
माणगाव : (प्रसाद गोरेगावकर) 3 जून रोजी रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने हाहाकार माजवला आणि अनेक कुटुंबाच्या घरांचे नुकसान झाले, शेतकरी व बागायतदार यांच्या शेतातील आंबा, काजू, नारळ, सुपारी, जांभूळ व आईनकिंजळ अशी अनेक झाडे उन्मळून पडली तर काही झाडे मोडून पडल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. शासनाने नुकसान झालेल्या कुटुंब व शेतक-यांना मदत जाहिर केली पण माणगाव तालुक्यातील अनेक कुटुंबाच्या खात्यावर मदत जमा झाली नसल्याने उद्याची चूल कशी पेटेल हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या कुटंबाना चक्रीवादळाने होत्याचे नव्हते केले. 40 दिवस उलटून गेल्यानंतरही माणगाव तालुक्यातील कुटुंब व शेतकरी मदतीपासून का वंचित राहिले हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. काहिही असले तरी प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या खात्यावर तात्काळ रक्कम जमा करावी अशी माणगाव तालुक्यातील नागरिक मागणी करीत आहेत.
शेतक-यांची वनविभागाकडे मागणी
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली तर काही झाडे मोडून पडली .आंबा, काजू, सुपारी, नारळ, आईनकिंजळ अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश असून त्या झाडांचं पुढं काय झालं याचं वनविभागाकडे रेकाॅर्ड आहे का ? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. रायगड जिल्ह्यातील शेतकरी व बागायतदारांच्या शेतातील झाडे उन्मळून पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून ते भरून न निघणारे असल्याने रायगड जिल्ह्यात मोडून पडलेल्या झांडाचा कोळसा पाडण्यासाठी वनविभागाने परवानगी देण्याची मागणी शेतक-यांकडून होत आहे.सध्या रायगड जिल्ह्यात कोळसा पाडण्यासाठी बंदी असून ती 3 ते 4 महिण्यापर्यंत उठवून शेतात पडलेल्या झाडांचा कोळसा पाडण्याची परवानगी शेतक-यांना मिळाली तर काही प्रमाणात झालेले नुकसान भरून निघेल अशी शेतकरी मागणी करीत आहेत.या मागणीचा वनविभागाने विचार करून पडलेल्या झाडांचा कोळसा पाडण्याची परवानगी दिली तर शेतकरी व बागायतदारांना आर्थिक फायदा होईल. विशेष म्हणजे माणगाव तालुक्यातील निवी या गावचे शेतकरी मंगेश देशमुख यांनी त्यांच्या शेतातील मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे रीप्लँट केले असून अनेक झाडांना जीवदान दिले आहे.
मंगेश देशमुख यांनी ज्याप्रमाणे झाडांना जीवदान दिले तसे रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांना जीवदान दिले तर होणारे नुकसान काही प्रमाणात तरी भरून निघेल हे मात्र खरे आहे.