विजेच्या लपंडावामुळे महावितरण विरोधात पत्रकाराला उपोषणाला बसण्याची वेळ.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) तळा तालुक्यातील नागरिकांना नेहमीच पाणी टंचाई आणि वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.या दोन कारणांमुळेच तालुक्यातील शिक्षक वर्ग,बँक अधिकारी,तसेच इतर विभागांचे शासकीय अधिकारी तळा सोडून इंदापूर, माणगाव अथवा रोहा येथे राहणे पसंत करतात.निसर्ग चक्रीवादळापासून तळा तालुक्यातील गायब झालेली वीज अद्यापही पूर्ववत करण्यात आलेली नाही.चक्रीवादळाच्या पंधरा दिवसानंतर आलेली वीज कायम न राहता वारंवार खंडित होत राहिल्यामुळे तालुक्यातील विजेवर अवलंबून असणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.तसेच शहराला पाणीपुरवठा करणारी आंबेळी पाईपलाईन येथील वीजपुरवठा देखील खंडित राहिल्याने शहरातील नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल झाले आहेत.तालुक्यात विजेचा गंभीर प्रश्न असतानाही स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत त्यामुळे वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याविरोधात पत्रकार विराज टिळक हे गुरुवार पासून तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत तसे निवेदन त्यांनी तहसीलदार ए. एम.कनशेट्टी यांच्याकडे दिले.तळा तालुका हा मागास राहण्यास महावितरण विभाग प्रमुख कारणीभूत आहे नेहमी वीज पुरवठा खंडित रहात असल्यामुळे अनेक कुटुंबांनी गाव सोडून शहराची वाट धरली आहे.तसेच तालुक्यात नवीन उद्योग येणे दूरच असलेले लहान मोठे उद्योग देखील बंद पडत चालले आहेत मात्र याचे गांभीर्य येथील प्रशासन व पुढाऱ्यांना नसल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार विराज टिळक यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.