महागाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी सचिन पांडुरंग जाधव यांची बिनविरोध निवड.
महाराष्ट्र २४ आवाज
तळा ( अनंत खराडे) रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत महागाव उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिन पांडुरंग जाधव यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे सरपंच सुषमा कांतीलाल कसबळे यांनी जाहीर केले. त्यावेळी माजी उपसरपंच मनीषा कापरे, महागाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुवर्णा तांबडे आणि सर्व सदस्य उपस्थित होते. या ग्रामपंचायतीतून उपसरपंच पदासाठी निवडून आलेल्या मनीषा कापरे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्या कारणाने त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते पद रिक्त झाल्यामुळे त्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी उपसरपंच पदासाठी शिवसेनेचे नितीन लक्ष्मण साळवी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिन पांडुरंग जाधव या दोघांचे अर्ज प्राप्त झाले. परंतु नितीन लक्ष्मण साळवी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सचिन पांडुरंग जाधव हे उपसरपंच पदी निवडून आल्याचे दुपारी एक वाजता सदस्यांची सभा घेत सरपंच यांनी जाहीर केले. तसेच नवनिर्वाचित उपसरपंच सचिन पांडुरंग जाधव यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच विठोबा हरी साबळे व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.