शहरातील वाढत्या रुग्णसंखेमुळे तळा बाजारपेठ एक आठवडा पूर्णतः बंद.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) तळा शहरात फोफावलेल्या कोरोना विषाणूमुळे शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्या सामान्य नागरिकांसह प्रशासनासाठीही डोके दुखी ठरत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांनी शहराची ग्रामदेवता चंडिका देवी मंदिरासमोर सर्व नगरसेवक, गावप्रमुख, व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची उपाययोजना संबंधी मीटिंग घेतली. यामध्ये नागरिक प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले.तसेच नागरिकांची विनाकारण बाजारपेठेत होणारी गर्दीही कोरोनाचा प्रसार होण्याचे मुख्य कारण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी मांडले.त्यामुळे सर्वानुमते रविवार दि.२० सप्टेंबर २०२० रात्री ९ वाजल्यापासून रविवार दि.२७ सप्टेंबर २०२० पर्यंत तळा बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रसंगी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, सभापती, गावप्रमुख व व्यापारी उपस्थित होते.