निसर्ग चक्रीवादळ सुधागड तालुक्यातील नाडसूर पंचायतमधील नुकसानग्रस्त नुकसान भरपाईपासून वंचित
ग्रामस्थांचा शासनाविरोधात नाराजीचा सूर
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडून तहसिलदार यांना निवेदन
महाराष्ट्र २४ आवाज
उपसंपादक- समीर बामुगडे
खालापूर : जूनमध्ये झालेल्या चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला फार मोठा तडाखा बसून यामध्ये सुधागड तालुक्यातील गावांनाही जबर तडाखा बसला होता. यामध्ये अनेकांची घरे, शेती, दुकाने उद्ध्वस्त झाली. यामध्ये सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायत हद्दीतील गावांचेही फार मोठे नुकसान झाले आणि शासनाकडून नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देखील मिळाली. परंतू या भागातील ग्रामस्थांना मिळालेल्या नुकसानभरपाईमध्ये प्रचंड तफावत असून या भागात शासनाने केलेल्या पंचनाम्यावर वैतागवाडी ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई पासून वंचित राहिलेल्या ग्रामस्थांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी याविषयीचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडून तहसिलदार दिलीप रायन्नावार यांना देण्यात आले.
जूनमधील निसर्ग चक्रीवादळात ज्या लोकांचे अधिक नुकसान झाले आहे त्यांना कमी तर ज्या लोकांचे कमी नुकसान झाले आहे त्यांना अधिक नुकसानभरपाई मिळाली असून शासनाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामे केले असून खरे नुकसानग्रस्त वंचित राहिले असल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. तर शासनाने कोणत्या निकषांच्या आधारे पंचनामे केले असा प्रश्न निर्माण झाला असून चुकीच्या पद्धतीने पंचनामे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून वंचित राहिलेल्या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अन्यथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि नाडसुर ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडून आपल्या कार्यालयासमोर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना देण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे खालापूर तालुकाध्यक्ष सतीश(संतोष) शेवाळे, संघाचे पदाधिकारी जतीन मोरे, माजी सरपंच महेश जाधव, कैलास खंडागळे, दीपक शिंदे,रोहिदास आदी उपस्थित होते.